‘पॉझिटिव्ह’ व्यक्‍तीला मनपाच्या ‘निगेटिव्ह’ वृत्तीचा फटका

Foto
कोरोना टेस्ट झाली. नॉर्मल सिमटन्स असल्याचा फोनही दुसर्‍या दिवशी आला. तशातच कोरोना टेस्ट ‘पॉझिटिव्ह’ असल्याची अनधिकृत पण खात्रीलाखक माहिती मिळाली. मनपाकडून काहीच मॅसेज, फोन येईना. तीन दिवस उलटले. प्रचंड मानसिक दडपणाखाली आलेली ही टेस्टेड व्यक्‍ती घरच्यांना ‘ताप’ म्हणून कसोशिने प्रयत्न करीत मनपा सेंटरवर चकरा मारून आणि विचारणा करून थकला. अखेर आपल्या पत्रकार मित्रांच्या मदतीने नक्‍की काय झाले ते शोधण्याचा प्रयत्न सुरू केला तर अगदी आरोग्य अधिकार्‍यांपर्यंत ‘बघते, चौकशी करते’ एवढेच ऐकू येऊ लागले. बराच सव्य-असव्य केल्यानंतर सदर व्यक्‍ती पॉझिटिव्ह (च) असल्याच्या निष्कर्षापर्यंत मनपाचा आरोग्य विभाग येऊन पोहचला आणि तब्बल चौथ्या दिवशी संबंधित रुग्णाची अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली.
अत्यंत चिड आणणार्‍या या लाजिरवाण्या घटनेमुळे कोरोना सारख्या महामारीकडे पाहण्याचा मनपा दृष्टीकोन यानिमित्ताने समोर आला आहे. प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांनी कोरोनच्या संदर्भात आपली प्राथमिकता अनेक वेळा दाखवली आहे. प्रत्येक सेंटरवर तेथ जातीने जात असतात. 15 ऑगस्टपर्यंत कोरोनाला रोखण्याचे त्यांचे नियोजन आहे, प्रयत्न आहे आणि दुसरीकडे त्यांचीच मनपाची यंत्रणा कमालीचा हलगर्जीपणा दाखवित असल्याचे ठळकपणे आधोरेखित करणारी ही घटना आहे. 
या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, संबंधित व्यक्‍ती कोरोनाची टेस्ट करून घेण्यासाठी एमआयटी महविद्यालयातील सेंटरवर गेली होती. टेस्ट करून आल्यानंतर दुसर्‍या दिवशी मनपातर्फे सिमटन्स असल्याचा त्यांना निरोप मिळाला. त्यामुळे एक प्रकारच्या दडपणाखालीच त्या व्यक्‍तीने क्‍वारंटाईन होण्याच्या दृष्टीने तयारी केली. मात्र मनपाकडून काहीच निरोप येईना. घरच्यांना त्रास नको या उद्देशाने संबंधिताने बॅगही भरून ठेवली होती. निरोप आला की, आपण स्वतः क्‍वारंटाईन होण्यासाठी जावे असा त्याचा विचार होता. परंतु एक-एक दिवस उलटून गेल्यानंतर मात्र ती व्यक्‍ती परेशान झाली. सेंटरवर चकरा मारून काहीच हाती लागत नव्हते. त्यामुळे संबंधिताने या प्रतिनिधीला संपूर्ण प्रकार सांगून मदत करण्याची विनंती केली.
बॅग भरून रुग्ण घराबाहेर
पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे माहीत नसल्याने पॉझिटिव्ह रुग्ण तिसर्‍या दिवशी घराच्या बाहेर पडले. केंद्रावर चौकशी करण्यासाठी घरातून बॅग घेऊन बाहेर पडले. जर पॉझिटिव्ह असेल तर कुटुंबातील सदस्यांना त्रास नको म्हणून हॉस्पिटलमध्ये बाहेरच्या बाहेरच जाता येईल. यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण बॅग भरून घराच्या बाहेरच होते. 
तीन दिवसांपूर्वी यादीत नाव आले होते
एकीकडे पॉझिटिव्ह असताना देखील रुग्ण घरी बसून रिपोर्ट ची वाट पहात आहे. दुसरीकडे मात्र तीन दिवसांपूर्वीच त्या रुग्णांचे नाव पॉझिटिव्ह यादीत होते. तरी देखील या रुग्णाबाबत तपासणी केंद्राला देखील माहिती नसल्याने एकच गोंधळ उडाला. रुग्ण देखील संभ्रमात सापडल्याने त्याच्यावर चकरा मारण्याची वेळ आली. 
मानसिक त्रास सहन करावा लागला
तीन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह रुग्णाला फोन येतो आणि पत्रे लावायचे आहे. कारण काहीच सांगितले जात नाही. यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण घाबरून गेला. घरातील इतर कुटुंबातील सदस्यांचा रिपोर्ट देखील निगेटिव्ह आले आहे. मग पत्रे का लावायचे? असा प्रश्न पॉझिटिव्ह रुग्णाला पडला. त्यांनी दोन दिवस वाट पाहिली. तिसर्‍या दिवशी पुन्हा तपासणी करण्यासाठी तपासणी केंद्रावर जाऊन धाव घेतली. एकतर रिपोर्ट दाखवा नाहीतर पुन्हा तपासणी करा असे पॉझिटिव्ह रुग्णाने मागणी केली. परंतु तपासणी केंद्रावर रिपोर्ट आला नाही असे सांगितले गेले त्यामुळे ते तपासणी न करता पुन्हा घरी गेले. यामध्ये मानसिक त्रास सहन करावा लागला. 
टीम पाठविली
त्या रुग्णांचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आहे की निगेटिव्ह याबाबत मनपा प्रशासनाला विचारणा केली असता. तो व्यक्ती कोरोनाबाधीत असल्याचे समोर आले. तीन दिवसांपासून या व्यक्तीला पॉझिटिव्ह असताना घरीच का ठेवले? असा प्रश्न विचारला असता टीम पाठविली आहे. असे सांगण्यात आले. 
तपासणी केंद्राला पॉझिटिव्ह असल्याचे माहीतच नाही
तपासणी केंद्राला त्या पॉझिटिव्ह रुग्णाची दैनिक सांजवार्ताने चौकशी केली असता त्या व्यक्तीचे स्वब घेतले आहेत. त्याचा रिपोर्ट आलेला नाही. रिपोर्ट आल्यानंतर सांगू. असे संबंधित तपासणी केलेल्या रुग्णाच्या तपासणी केंद्रावर सांगण्यात आले. यावरून तपासणी केंद्रावर ज्यांनी स्वब घेतले त्यांना त्या रुग्णाचे पॉझिटिव्ह असल्याचे माहीतच नसल्याचे स्पष्ट झाले.
प्रचंड मनस्ताप 
कोरोनाचे नाव घेतले तरी खूप भीती वाटते. अशा वातावरणात टेस्ट केल्यानंतर माझी मानसिक स्थिती कशी असेल याचा विचारच केलेला बरा. माझ्यामुळे कुटुंबियांना त्रास होऊ नये यासाठी संपूर्ण प्रेशर मी स्वतःवर घेत होतो. मनपाकडून काहीच हालचाल दिसत नव्हती. ते तीन-चार दिवस मी कसे काढले असतील हे परमेश्‍वरच जाणो. 
-पॉझिटिव्ह रुग्ण.